फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई ; आरोपी प्रशांत बनकरला अटक
फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी प्रशांत बनकर याला अटक केली आहे. प्रशांत बनकर हा पीडित डॉक्टर राहत असलेल्या इमारतीच्या मालकाचा मुलगा असून, तो गेल्या काही दिवसांपासून फरार होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बनकर पुण्यातील आपल्या एका मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसला होता. अखेर सातारा पोलिसांच्या पथकाने शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.या प्रकरणात आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती. या नोटमध्ये तिने प्रशांत बनकरचे नाव नमूद करत त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. पोलिसांच्या तपासात असेही समोर आले आहे की आत्महत्येच्या काही वेळाआधी तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यात फोन आणि मेसेजद्वारे संवाद झाला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रशांतला अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने अजूनही फरार आहे. सुसाईड नोटमध्ये डॉक्टर तरुणीने गोपाल बदनेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. घटनेनंतर तो पोलिस सेवेवरून पळून गेलेला असून, त्याच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या हालचालींबाबत काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले असून लवकरच तो अटकेत येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
घटनाक्रमामुळे साताऱ्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. एका तरुण डॉक्टरच्या आत्महत्येचे धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा अधोरेखित झाला आहे. प्रशांत बनकरच्या अटकेमुळे तपासात नवा टप्पा आला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पुढील काही दिवसांत आरोपींवर ठोस कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे




